Ad will apear here
Next
मृदुल करांनी छेडित तारा...
सुमन कल्याणपूरसुमन कल्याणपूर नावाचे शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वर आणि रमेश अणावकर नावाचे, नेमकी भावना व्यक्त करणारे नि सुरांशी जुळवून घेणारे शब्द.... अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. सुमन कल्याणपूर यांचा ८३वा वाढदिवस २८ जानेवारीला झाला, तर आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा १६वा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज आस्वाद घेऊ या अणावकर यांनी रचलेल्या आणि सुमनताईंनी गायलेल्या ‘मृदुल करांनी छेडित तारा... ’ या कवितेचा...
.........
वीकेंडला जोडून एखादी सुट्टी आली, की शहरातले लोक गाड्या घेऊन बाहेर पडतात. रोजच्या ट्रॅफिक जॅमला कंटाळून दूरवरची हवेशीर पर्यटन स्थळं गाठतात. गंमत म्हणजे पर्यटनस्थळी घेऊन जाणारे रस्ते पुन्हा जाम होतात. ती सगळी धावपळ, चिडचिड पिच्छा सोडत नाही. गाडीत गाणी वाजत असतात. एखादं गाणं असं येतं, की सगळी चिडचिड, संताप, राग शांत करतं. अक्षरश: मेडिटेशनचा अनुभव येतो. भावनेनं ओथंबलेला प्रत्येक शब्द तितक्याच अलवार, मधुर स्वरांमधून आपल्या मनाला शांत करत असतो. असे शब्द असतात रमेश अणावकर यांचे आणि स्वर असतो सुमन कल्याणपूर यांचा. सतारीच्या तारा हळुवार हातांनी छेडल्या जातात, त्यातील झंकार आपल्याला घेऊन जातो भावगीतांच्या दुनियेत. या दुनियेत साम्राज्य असतं शब्द-सुरांचं! हातात हात घालून रसिकमनाला रिझवण्याचं व्रत घेतलेलं असतं ते साम्राज्य! या साम्राज्यात आपली भेट होते सुमन कल्याणपूर नावाच्या शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वरांशी आणि रमेश अणावकर नावाच्या भावगीतकाराशी!! अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. परवा २८ जानेवारीला सुमनताईंना ८३ वर्षं पूर्ण झाली आणि आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा स्मृतिदिन. त्या निमित्तानं स्वरांनी मोहरलेली ही कविता आठवली...

स्मरते रूप हरीचे मीरा

मृदुल म्हणजे किती मृदुल असावं, हे समजून घ्यायचं असेल तर सुमनताईंच्या आवाजातलं हे गीत ऐकावं. सुमनताईंच्या गाण्याविषयी बोलताना माझ्या डोळ्यांपुढे नेहमी एक दृश्य येतं. एकीकडे भला मोठा रुंद, चकाकणारा डांबरी रस्ता, जीवघेण्या स्पर्धेत धावणाऱ्यांना घेऊन जाणारा... तर दुसरीकडे दूरवरची एखादी हिरवळीची किनार लाभलेली, लाल तांबड्या मातीची नागमोडी पाऊलवाट, जी कुठल्याही धवपळीची, स्पर्धेची, चढाओढीची, भरपूर काही तरी मिळवण्यासाठी जिवाच्या आकांतानं धावणारी नसते. ती असते आत्ममग्न, स्वान्तसुखाय चालत राहणारी. तिथं नसते कुठलीही वसवस, नसतात स्पर्धेत दमछाक होऊन सोडलेले सुस्कारे. तिथं असतात फक्त समाधानाचे नि:श्वातस, मोकळा श्वांस. खरंच सुमन कल्याणपूर म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर येते ती आत्ममग्न पाऊलवाट. त्या पाऊलवाटेवर आपल्याला भेटतात त्यांचे शांत, सुमधुर स्वर आणि आपल्या मनाच्या तारांशी जुळणारी मनोहारी भावगाणी!

कमलदलापरी मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरी
हर्षभराने तनुलतिकेवरी 
पडती अमृतधारा... मृदुल करांनी छेडित तारा।

कमलदलावरच्या दवबिंदूंपेक्षा नाजूक शब्दरचना रमेश अणावकरांची, तितक्याच अलवारतेनं संगीतकार दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केली आणि सुमनताईंच्या गळ्यातून जणू अमृतधारा बरसली. तसे पाहता रमेश अणावकर हे, ज्यांच्यामुळे स्वरांचा वसंत भावगीतांच्या दुनियेत भरभरून फुलत राहिला ते साक्षात स्वरवसंत वसंत प्रभू यांचे लाडके कवी. ते दशरथ पुजारी यांना वसंत प्रभू यांच्या घरी भेटले. वसंत प्रभू आजारी होते. क्षेमकुशल विचारण्यासाठी दशरथ पुजारी वसंत प्रभूंच्या घरी गेले होते. स्वत: दशरथ पुजारी भावगीतांचे चाहते होतेच. भावगीतांच्या निर्मितीमध्ये पुजारींचंही नाव सर्वदूर होत होतं. तब्येतीची विचारपूस झाली, तेव्हा वसंत प्रभू म्हणाले, की मी तुला एक चांगला कवी देतो. फार चांगल्या रचना करतो. शब्दरचना भावना व्यक्त करण्यासाठी पोषक असतातच; पण सुरांशीही ते शब्द छान जुळवून घेतात. वसंत प्रभूंसारख्या संगीतकारानं रमेश अणावकर यांच्या काव्यलेखनातलं मर्म जाणलं होतं. वसंत प्रभू स्वत:च उत्तमोत्तम कवितांचे आस्वादक होते, काव्यरसिक होते, मर्मज्ञ होते. रमेश अणावकरांच्या कवितेचा हात दशरथ पुजारी यांच्या स्वरांच्या हाती त्यांनी अलगद सोपवला आणि एक कविता स्वरांनी अशी काही मोहरली, की त्याचा आनंदगंध आजही रसिकमनात दरवळतो आहे. हर्षभरानं काव्यलतिका मीरेच्या रूपात कशी फुलत राहिली पाहा.

कालिंदीच्या नीलजलापरी
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी
खुलवी प्रीत फुलोरा... मृदुल करांनी छेडित तारा।

निळ्या जललहरींना घेऊन वाहणारी कालिंदी, कुंजवनातला प्रीतफुलोरा आणि तन्मयतेनं कृष्णभजनात रममाण झालेली मीरा, रमेश अणावकर यांच्या शब्दांमधून आणि दशरथ पुजारी यांच्या स्वररचनेमधून साकार होण्यासाठी सुमनताईंचा मधुर गळा हेच माध्यम किती योग्य ठरलं याची प्रचिती म्हणजे ‘मृदुल करांनी छेडित तारा’ हे गाणं.

सुमन कल्याणपूर पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी. ढाक्यात जन्मलेल्या, पण नंतर मुंबईत आलेल्या. सहा भावंडांतल्या त्या सर्वांत मोठ्या. चार बहिणी, एक भाऊ. वडिल बँकेत वरिष्ठ अधिकारी. १९४३मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी संगीताचे धडे घेतले. शिक्षण आणि संगीताची आराधना दोन्ही सोबतच. मुंबईतल्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये त्यांनी चित्रकलेच्या शिक्षणाबरोबर स्वरांमध्येही रंग भरणं आत्मसात केलं. आकाशवाणीनं कितीतरी कलाकारांना प्रकाशात आणलं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुमनताई. त्यांचं पहिलं गाणं आकाशवाणीवरून प्रसारित झालं हे आवर्जून सांगायला हवं. ‘शुक्राची चांदणी’ या १९५३च्या चित्रपटातून त्यांना पार्श्वंगायनाची संधी मिळाली. आणि मग मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही त्या गाऊ लागल्या. शालीन स्वरांनाही स्पर्धेच्या दुनियेत उपेक्षेची वेदना सोसावी लागते. त्याला सुमनताई तरी अपवाद कशा असणार? ती उपेक्षा, पाय ओढण्याची वृत्ती सुमनताईंनीही अनुभवली. तरीही दिग्गज संगीतकारांनी आणि रसिकांनी सुमनताईंच्या सुमधुर स्वरांसाठी काळजातला एक खास कप्पा राखून ठेवलाच. रमेश अणावकरांसारख्या कवींची काव्यरूपी मीरा सुमनताईंच्या गळ्यातून तन्मयतेनं, आत्ममग्नतेनं गात राहिली.

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची
रंगवी हसरी मथुरा... मृदुल करांनी छेडित तारा।

३० जानेवारी २००४ रोजी रमेश अणावकर इहलोक सोडून गेले; पण त्यांच्या भावपूर्ण रचना रसिकांच्या मनात चिरस्मरणीय राहिल्या आहेत. ‘प्रभाती सूर नभी रंगती’ ही आशाताईंनी गायलेली भूपाळी किंवा सुमनताईंच्या आवाजातली ‘केशवा माधवा,’ ‘ते नयन बोलले काहीतरी,’ ‘नकळत सारे घडले,’ ‘वाऱ्यावरती घेत लकेरी,’ ‘मस्त ही हवा,’ अशी गाणी किंवा दशरथ पुजारी यांच्याबरोबर गायलेलं युगलगीत असो... किती गाणी सांगावीत. २८ जानेवारीला सुमनताईंचा वाढदिवस अशा सुरेल गीतांनी सजलेला आणि रमेश अणावकर यांचा ३० जानेवारी हा स्मृतिदिन त्यांच्याच भावपूर्ण शब्दांनी भिजलेला. शब्दस्वरांचा हा प्रवास कधी संपूच नये, असं वाटतं. आपल्याच स्वरानंदात रममाण असलेली आणि मन:शांतीचा साक्षात्कार घडवणारी, स्वरांनी मोहरलेली कवितेची पाऊलवाट कधी संपूच नये असं वाटतं. चालत राहू या, मृदुल करांनी छेडत राहू या मनाच्या तारा. त्यातून झंकारत राहणार फक्त स्वरानंद आणि अशी स्वरांनी मोहरलेली कविता!!

मृदुल करांनी छेडित तारा
स्मरते रूप हरीचे मीरा... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ते पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZINCI
Similar Posts
अजून त्या झुडुपांच्या मागे... कविवर्य वसंत बापट यांचा २५ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ या त्यांच्या कवितेबद्दल...
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव... ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला (शके १२९६) संजीवन समाधी घेतली. दर वर्षी या दिवशी आळंदीत विशेष सोहळा आयोजित केला जातो. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव...’ या रचनेबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language